सातारा प्रतिनिधी | पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतेच आंदोलन केले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाकडून केल्या जात असलेल्या हप्ते वसुलीचा पाढाच अंधारे व धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांच्या समोर वाचून दाखवला. आंदोलनावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचा फोटो वापरल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. मंत्री शंभूराज देसाई रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे.
पुणे अपघात प्रकरणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना रवींद्र धंगेकरांनी जाब विचारत अनेक गंभीर आरोप केले. त्यासोबतच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधातही बेताल वक्तव्य केल्याचा आरोप शंभूराज देसाईंच्या कार्यालयाकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राऊतांप्रमाणे धंगेकरांना मिळणार नोटीस
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपल्या रोखठोक सदरातून गंभीर आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांना शिंदेंकडून कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. तीन दिवसांत नोटीशीला उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरं जा, असंही नोटीशीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अशीच कारवाई आता धंगेकरांनाही मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.