सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलजीवन मिशनंतर्गत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून महायुती म्हणून आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढाव्यात असे आम्हाला वाटते. पण जिल्हास्तरावर महायुती करण्याची भाजपाची इच्छा नसेल तर आमचीही त्यासाठी बळजबरी नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. त्यांच्याप्रमाणे आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी असेल, अशी भूमिका पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केली.
साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री देसाई पुढे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढल्या जाव्यात अशी आमची इच्छा आहे. जिल्हास्तरावर त्यांना महायुती करावयाची नसेल, तशी त्यांची इच्छा असेल तर आमची काय बळजबरी नाही.
विशेष म्हणजे आम्ही कोणाच्याही मागे लागणार नाही. त्यांची जशी तयारी असेल तशी आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी असेल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. यापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी देखील भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवणूक स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार?हे पहावे लागेल.