कण्हेरखेडच्या पवित्र मातीने दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली : मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

0
1057
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पत्नी प्रियदर्शनीराजे आणि पुत्र आर्यमानराजे यांच्यासह कण्हेरखेड गावास भेट दिली. गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपले पिताश्री माधवराव शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले. यावेळी कण्हेरखेडच्या पवित्र मातीने भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली. श्रीमंत महादजी शिंदे हे या पवित्र भूमीतील वीर योद्धा होते. आज या पवित्र मातीला वंदन करताना आनंद होत असल्याचे मंत्री शिंदे यांनी म्हंटले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, फलटणच्या श्रीमंत महाराजा महादजी शिंदे प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन शिंदे आदी मान्यवर आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मी कोणी राजकीय नेता अथवा केंद्रीय मंत्री म्हणून या गावात आलो नाही, तर या कुटुंबातील प्रमुख म्हणून आलो आहे. जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत कण्हेरखेडच्या विकासामध्ये योगदान देणार असून, शिंदे मंडळींबरोबर कायम राहणार आहे.

यावेळी त्यांनी सहकुटुंब कण्हेरखेड गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले. तसेच नगर प्रदक्षिणा घातली. राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांसह शिंदे कुटुंबीयांशी संवाद साधला. पाच ते सहा वर्षातून मी कण्हेरखेडला येतो. या गावचा मी सुपुत्र आहे. या गावच्या विकासामध्ये मी आजवर योगदान दिले आहे, भविष्यात देखील देणार आहे. गेल्यावेळी जेव्हा आलो, त्यावेळी पाणी योजनेचा विषय ग्रामस्थांनी उपस्थित केला होता, तो त्याचवेळी मार्गी लावला आहे. यापुढेही विकासात योगदान देत राहू, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.