राज्‍यात 20 लाख घरकुलांना मान्यता देणार – मंत्री जयकुमार गोरे

0
2

सातारा प्रतिनिधी | मंत्रालयात मंगळवारी विविध महापुरुषांना अभिवादन करून श्री. जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पना राबवून या खात्याचे नाव उंचावण्यावर भर देणार आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार असल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हंटले.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार सचिन पाटील, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अंकुश गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, भीमराव पाटील, किरण बर्गे, ओएसडी नारायण गोरे, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, ऋषी धायगुडे, वैष्णवी गोरे, अदित्यराज गोरे आणि अधिकारी उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर श्री. गोरे पुढे म्हणाले, ”माझा मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर माझी नाळ जुळली आहे. गेली १५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गावगाड्याबरोबर जोडला गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला याच विभागासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.

येणाऱ्या काळात मंत्रिपदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सोयीसुविधा आणखी सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्यात येणार आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवून वेगाने निर्णय घेऊन ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवून हे उद्दिष्ट १०० दिवसांत पूर्ण करणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणखी ५० लाख लखपती दीदी होणार आहेत.