सातारा प्रतिनिधी | राज्यासह सातारा जिल्ह्यात अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू असून अजून काही प्रकल्प प्रस्तावित आहेत. अशा प्रकल्पना गती देण्यासाठी प्रशासनाकडून व संबंधित मंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व मंजूर प्रकल्पांच्या कामांना गती देण्याविषयी पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत माण-खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्यशासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. या औद्योगिक वसाहतीला केंद्राकडून ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या वाढीव कामांना राज्यशासनाने 2024 साली मान्यता दिली आहे.
उरमोडी योजनेच्या कामांचीही सुधारीत किंमत 3042 कोटी ठरवण्यात आली आहे. या योजनेची निम्मी कामे झाली असली तरी उर्वरित कामांसाठी केंद्राच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिहे-कठापूर आणि उरमोडी वाढीव योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घेऊन निधीची तरतूद करण्याबाबत पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा करण्यात आली. नव्याने निर्माण होत असलेल्या मुंबई-बंगळूर महामार्गालगत खटाव तालुक्याजवळ एअरस्ट्रीप उभारणीचे प्रयोजन आणि त्याबाबत कार्यवाहीची चर्चा करण्यात आली.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे गरजेचे असल्याने त्या कामाला गती देण्याविषयी पंतप्रधानांबरोबर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले.