मिनी काश्मीर महाबळेश्वरात गारठा कायम; रात्रीप्रमाणे दिवसाही हुडहुडी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचा गेल्या आठवडाभरापासून कडाक्याची थंडी पडत असून महाबळेश्वरात देखील गारठा कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यात थंडीची लाट वाढू लागल्याने शेकोट्या पेटवून थंडीपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. सातारा शहरात शनिवारी ११.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यातील हे गेल्या काही वर्षांतील नीच्चांकी तापमान ठरले आहे. तसेच महाबळेश्वरमध्ये रात्रीसह दिवसाही गारठा कायम असून, दिवसाही अंगातून थंडी जाईना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान थंडीची तीव्रता कमी होती. पण, त्यानंतर थंडीचा जोर वाढत गेला. त्यामुळे मागील १० दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच ठिकाणचे किमान तापमान हे १५ अंशाच्या आतच आहे. परिणामी, जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीच्या कामांवरही मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना सकाळी शेतीची कामे करताना अडचणी येत आहेत. दाट धुके आणि दवबिंदूमुळे भांगलणीची कामे ही दुपारी करावी लागतात. त्याचबरोबर शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झाला आहे. दुपारीच बाजारपेठेत ग्राहक दिसून येतात.

सातारा शहरात तर मागील पाच दिवसांपासून किमान तापमान १२ अंशाच्या आसपास आहे. शनिवारी ११.९ अंशाची नोंद झाली. मागील काही वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील हा नीच्चांकी पारा ठरला. तर शहर आणि परिसरात थंडी वाढल्याने नागरिकांना ऊबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. तसेच सकाळच्या सुमारास फिरणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.

थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार

महाबळेश्वर सोडून काही किलोमीटर अंतर सोडून गेल्यावर बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असलेली गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत. सायंकाळी पर्यटकांसह स्थानिकही थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार घेत आहेत. लिंगमळासह शहरातील विविध भागांमध्ये स्थानिकांसह पर्यटक हे शेकोटी पेटवत आहेत. जिल्ह्यात यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. दरवर्षी नोव्हेंबरला सुरूवात होण्यापूर्वीच थंडीची चाहूल लागते. पण, यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतर थंडी पडण्यास सुरूवात झाली.

सातारा शहरातील किमान तापमान…

दि. २१ नोव्हेंबर १३.६

दि. २२ नोव्हेंबर १३.७

दि. २३ नोव्हेंबर १४.२

दि. २४ नोव्हेंबर १४.५

दि. २५ नोव्हेंबर १३.८

दि. २६ नोव्हेंबर १२.९

दि. २७ नोव्हेंबर १२

दि. २८ नोव्हेंबर १२.५

दि. २९ नोव्हेंबर १२.२

दि. ३० नोव्हेंबर ११.९