मिनी काश्मीर महाबळेश्वरातील वेण्णालेकवर गोठले दवबिंदू; हिमकण दिसण्याची पहिलीच वेळ

0
1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गत आठवड्यात थंडीचा कडाका वाढला असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पहायला मिळत आहे. दरम्यान, आज महाबळेश्वर परिसरातील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बघायला मिळाले. वेण्णालेक परिसरात सोमवार रात्री ते मंगळवारी पहाटे ४ अंशापर्यंत तापमान खाली आले होते. या थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीचा चांगलाच कडाका वाढला असून सोमवारी रात्री थंडीत वाढ झाल्याने मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत खाली उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे.

मंगळवारी पहाटे वेण्णालेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला होता. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले. येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरामध्ये चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेकच्या लोखंडी जेटीवर काही प्रमाणात दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्रे पहायला मिळाले. तर लिंगमळानजीक स्मृतीवन परिसरात तर झाडाझुडपांच्या पानांवर हिमकण जमा झाले होते.