म्हसवडला आता अप्पर तहसील कार्यालय; राज्य शासनाकडून अध्यादेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | म्हसवड (ता. माण) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच जारी केला. या तहसील कार्यालयांतर्गत ४ महसुली मंडळे, २७ तलाठी सजे आणि ४७ गावांचा समावेश होणार आहे.

सातारा जिल्हयातील माण तालुक्यात म्हसवड या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जाची नगरपालिका, पोलिस ठाणे व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत आहे. या बाबींचा विचार करून शासनाची धोरणे व योजना ग्रामीण भागामध्ये सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी दि. १९ सप्टेंबर २०१९ रोजी माण तालुक्यात म्हसवड येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार म्हसवड परिसरातील नागरिकांना महसुली सेवा नजीकच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता म्हसवड येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माण तहसील कार्यालय यानिमित्ताने अधिक बळकट करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

४७ गावांतील जनतेची गैरसोय होणार दूर…

माण तालुका डोंगराळ व दुष्काळग्रस्त तालुका असून, त्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. दहिवडीत तालुक्याचे मुख्यालय आहे. तालुक्यातील दळणवळणाच्या सोयीसुविधा विचारात घेता, नागिरकांना दैनंदिन महसूल विषयक प्रशासकीय कामकाजासाठी दहिवडी येथे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाच्या या अध्यादेशामुळे अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता महसुली दाखले म्हसवडमध्ये उपलब्ध होणार असून, ४७ गावांतील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.