हवामान विभागाचा सातारासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस

0
718
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पाऊस कमी पडत आहे. गेल्या चार दिवसांत पावसाने काहीशी विश्रांती देखील घेतली होती. या विश्रांतीनंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून सातारा परिसरात २.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत साताऱ्यातील कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

सातारा जिल्हा वगळता गेल्या २४ तासांत पुण्यातील शिवाजीनगर परिसर पावसासाठी खुला राहिला. या काळात कमाल तापमान २८.२ अंश सेल्सिअस होते. पुढील २४ तासांत, पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिसरात १.१ मिमी पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदली गेली. कमाल तापमान २७.३ अंश सेल्सिअस राहिले. पुढील २४ तासांत कमाल तापमान २९ अंशांवर स्थिर राहील. तसेच, कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान ३० आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.