हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. तरीही अजुन पश्चिम भागात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतही कमी पाणीसाठा आहे. अशातच हवामान विभागाने दि. ८ आणि दि. ९ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विशेषता करुन जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाट क्षेत्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम भागात दरडी कोसळतात, झाडे पडतात. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

प्रशासनाने असेही केले आवाहन..

1) नदीनाल्यावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
2) पर्यटनस्थळे, धबधबे, धरण परिसर, घाटमाथा आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जायचे टाळावे.
3) पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय आणि मोबाईलचा वापर करू नका.
4) प्रवास करताना घाट रस्त्यात विनाकारण थांबू नये.
5) अफवांवर विश्वास आणि अफवाही पसरवूही नका.