सातारा प्रतिनिधी | शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आज देखील हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मध्य महाराष्ट्रात १४ तारखेला कोल्हापूर आणि साताराला जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे रेड अलर्ट दिला आहे.
पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणीत १५ तारखेला मेघगर्जना विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.