रेल्वे रूळाखालून सोयीच्या रस्त्यासाठी नडशीकर आग्रही; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील नडशी, उत्तर कोपर्डे येथील रेल्वेमार्ग रूंदीकरणात गेट क्र. 95 येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वे अधिकारी सुरेश पाखरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी रेल्वे प्रशासनाने केलेल्या सर्व्हेच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी , प्रवीण पिसाळ, गणेश थोरात, सर्जेराव थोरात, संतोष थोरात, विश्वास थोरात, निवास पाटील, मंगेश पाटील, राजेंद्र थोरात, रवींद्र थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या प्रयत्नातून नुकतीच कराड येथे बैठक झाली होती. त्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पुणे येथेही समन्वय बैठक घेण्यात आली होती. शिवाय प्रत्यक्ष रस्त्याची पडताळणी करण्यासाठी रेल्वे अधिकारी वेळोवेळी येऊन गेले आहेत. त्या प्रत्येकवेळी मोजमापे घेताना अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या सोयीबाबत नेहमीच तोंडी समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु, प्रत्येक बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या दिशाभूल केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष पाहणीत ‘रस्ता होईल’, पण बैठकीत उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ‘रस्ता बसत नाही’ सांगितले गेले. यावरून रखडलेल्या रेल्वे रूंदीकरणापुढे प्रशासनाला स्थानिकांच्या जीविताबाबत कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून नडशीकर ग्रामस्थ रेल्वे रूंदीकरणाचे कामकाज बंद ठेवण्यावर ठाम आहेत. रोजच्या रहदारीसाठी पुन्हा गैरसोय झाल्यास ग्रामस्थांच्या रोषास रेल्वे प्रशासनास सामोरे जावे लागणार आहे.