सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठराव समितीची सभा पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुका नजिकच्या काळात होणार असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या.
ठराव समितीच्या सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, क्रांती बोराटे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व प्रभावती कोळेकर, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अरूणकुमार दिलपाक, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आदी विभागांतर्गत योजनांची प्रचार प्रसिध्दी करुन जास्तीत जास्त लाभार्थींची निवड करण्याच्या सूचना नागराजन यांनी दिल्या. या सभेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या निर्लेखन करून पाडण्यास मान्यता देण्यात आली. बांधकाम विभागातील कामाच्या सुरक्षा ठेवी व्यपगत झाल्याने ठेकेदारांना परत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. निलेश घुले यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.