नावे समाविष्ट करण्यासाठी सुमारे 6 हजार अर्ज प्राप्त : सुधाकर भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सर्व दुरुस्त्यासह अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रक्रियेच्या अनुषंगाने सूचना असल्यास सादर कराव्यात असे भोसले यांनी आवाहन करीत यावेळी नावे समाविष्ट करण्यासाठी सुमारे ६ हजार अर्ज प्राप्त झाल्याचे देखील भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बैठकीस निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) मनोज चाकणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गणेश चव्हाण, शिवसेना पक्षाचे अमोल सुभाष इंगोले आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाप्रमाणे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास १८ वर्ष पूर्ण करणारे युवा मतदार यांच्यासह नवविवाहिता, तृतीय पंथीय यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे.

भोसले म्हणाले, महाविद्यालये आणि गावात जाऊन मतदारांकडून आवश्यक अर्ज नमुने भरुन घेतले. त्याचप्रमाणे रुग्णालयातून किंवा ग्रामसेवक व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून जन्मनोंदणीची माहिती घेऊन त्यानुसार संबंधीत कुटुंबाकडून अर्ज घेत नावे मतदार यादीत समाविष्ट केली. नावे वगळण्याची, नवविवाहिता यांची नावे समाविष्ट करणे अथवा वगळणीची प्रक्रियादेखील कुटुंबियांच्या माध्यमातून अर्ज भरुन घेऊन पूर्ण करण्यात आली.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतः नावांच्याबाबतीत करणार कार्यवाही

याशिवाय मतदार स्वतः तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत येऊन, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), व्होटर हेल्प लाईन द्वारे आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी (बीएलए) मार्फत चुकीची नावे दुरुस्त करणे, चुकीची अथवा खराब छायाचित्रे बदलणे, मयत व्यक्तींची नावे वगळणे, पत्ता बदल आणि नवीन नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया नमुना क्र. ६, ७ व ८ समक्ष अथवा ऑनलाईन भरुन देवून पूर्ण करु शकत असल्याचे प्रांताधिकारी भोसले यांनी सांगितले.

सुमारे 6 हजार नावे समाविष्ट होणार

या संपूर्ण प्रक्रियेनुसार आतापर्यंत नावे वगळण्यासाठी नमुना क्र. ७ चे १० हजार ७६८ अर्ज आणि नव्याने समावेश करण्यासाठी ५ हजार ८९२ अर्ज क्र. ६ प्राप्त झाले असून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. हयात व्यक्तीचे नांव मतदार यादीमधुन वगळले असल्यास निरंतर मोहिमेमध्ये ते नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज भरुन देण्यात यावा. वगळलेल्या व समाविष्ट केलेल्या मतदारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत असून त्याबाबत काही त्रुटी, सूचना असल्यास सादर कराव्यात.