सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सोमवारी (दि. 11) रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता साताऱ्यातील येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असून इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
या महिन्यात नुकतीच साताऱ्यात सातारा जिल्हा इंडिया आघाडीची बैठकपार पडली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज उर्फ बंटी पाटील, खा.श्रीनिवास पाटील साहेब, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, राजकुमार पाटील, सुनिल माने, नितिन बानगुडे पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, डॉ.भारत पाटणकर, श्रीमती आनंदी अवघडे, चंद्रकांत खंडाईत, भगवान अवघडे, निरंजन फरांदे, विविध पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे तसेच निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती ठरवली. आपला सातारा जिल्हा हा यशवंतरावजी चव्हाण साहेब व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा आहे हे विरोधकांना खऱ्या अर्थाने दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखविले होते. त्यानंतर आता पुन्हा उद्या महाविकास आघाडी व घटक पक्षातील नेते एकत्रित येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उद्याची होणारी बैठक ही महत्वाची आहे कारण कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. दरम्यान, या उद्याच्या बैठकीत काय होणार? हे पहावे लागणार आहे.