सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत खटाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील. तरी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,’ असे आवाहन वडूजच्या तहसीलदार बाई माने यांनी केले.
वडूज येथील तहसील कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहिता माहिती देण्यासाठी नुकतीच राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, जिल्हा काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, सूर्यभान जाधव, रजीत निवडणूक नायब तहसीलदार महेश चक्के, अव्वल कारकून सुजाता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची सविस्तर तत्त्वे तहसीलदार बाई माने यांनी यावेळी बैठकीत स्पष्ट केली. याप्रसंगी सिद्धनाथ गोडसे, शुभांगी भांडवलकर, ज्योत्स्ना सरतापे, अजित नलावडे, राजेंद्र जगताप यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.