कराड प्रतिनिधी | संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी आपले दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात सभा आयोजित केल्या असून त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा होत आहे. यात विशेष म्हणजे दि. 30 एप्रिल रोजी शरद पवार यांची सभा पाटण येथे होणार आहे. दरम्यान, याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील कराड येथे सभा होणार होती. मात्र, ती आदल्या दिवशी म्हणजे 29 एप्रिल रोजी घेण्याचा अचानक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दोघांची सभा एकाच दिवशी होण्याचा मुहूर्त टळला. अन्यथा एकाच दिवशी दोघांच्या तोफा धडडाल्या असत्या.
महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यभरातील लोकसभा मतदार संघातील सभांचे नियोजन केले आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अचानक सभाचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमधील वरिष्ठ नेत्यांच्या मैदानी तोफांनी जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा चांगलाच उडणार आहे. साताऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत. या सभांच्या ठिकाणांची निवडही विचारपूर्वक केली आहे. वाई, पाटण आणि कराड या ठिकाणांची निवड केली आहे. वाईतील आजी व माजी आमदार महायुतीत आहेत.
पाटणला शिंदेसेनेचे शंभुराज देसाई आणि सातारा येथे भाजपची ताकद आहे. याचा विचार करून शरद पवार यांच्या दौऱ्यांचे नियोजन केले आहे. यापैकी दि. ३० तारखेच्या पाटणला आदित्य ठाकरे, तर दि. ४ रोजी साताऱ्यात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारालाही दिग्गज नेते येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दि. २९ रोजी सैदापुर, कराड येथील ॲग्रीकल्चर ग्राउंडवर होत आहे.
महायुतीने कराड उत्तर व दक्षिण व पाटणमधील ५५ टक्के मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे. यादृष्टीने तिन्ही मतदारसंघांचा विचार करून कराड या ठिकाणाची निवड केल्याचे दिसून येत आहे. शिवाय हातकणंगले, सांगली, माढा आदी मतदारसंघांचाही विचार करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न दिसत आहे. याशिवाय दि. १ ते ५ तारखेपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच स्मृती इराणी आदी दिग्गज नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्यात येत आहे.