सातारा प्रतिनिधी | इंडिया आघाडीतील घटक पक्ष, परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांच्या संघटना आणि 60 निमंत्रित प्रतिनिधींच्या उपस्थितीत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उद्या बुधवार दि .६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, डॉ. भारत पाटणकर, माजी आ. लक्ष्मण माने आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
केंद्रातील भाजपा सरकारच्या द्वेषमूलक आणि भ्रष्ट कारभारामुळे भारतातील जनतेचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तसेच केंद्राच्या दडपशाही कारभारविरोधात सर्वजण संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या विरोधात देशपातळीवर इंडिया आघाडीच्या नावाने आगामी लोकसभा निवडणुकीच्यासाठी सगळे संघटित झाले आहेत.
या पार्श्भूमीवर चर्चा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व पुरोगामी व धर्म निरपेक्ष पक्षांच्या जिल्हास्तरावरील सर्व घटक पक्ष व पुरोगामी विचारांच्या संघटनांची बैठक बुधवारी सकाळी 9 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी येथे होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी दिली आहे.