वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सोनियाचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू; कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील घटना

0
14

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय सोनिया अविनाश कांबळे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनिया कांबळे ही तरुणी कराड येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयातून दुचाकी (क्रमांक एम एच ५० के ०८१०) वरून घरी जात होती. तेव्हा पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे डंपर (क्रमांक एम एच १७ बी वाय ७०४१) ने तिच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत डंपरने दुचाकीसह सोनियाला काही अंतर फरफटत नेले, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोनियाला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या प्रकरणी डंपरचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.