रात्री शेतात पार्टी चालू असताना तरुणाचा खून; पोलीस पाटलांच्या Whatsapp ग्रुपमुळे असा लागला छडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेढा | रात्री शेतात जेवणाची पार्टी चालू असताना झालेल्या वादावादीतुन एका तरुणाचा खून झाल्याची घटना मेढा येथे घडली आहे. पोलिसांना मिळालेला मृतदेहाची ओळख न पटल्याने खुनाचा तपास करणे अवघड झाले होते. यापार्श्वभूमीवर सदर मृत अनोळखी व्यक्तीची माहिती पोलीस पाटील यांच्या whatsapp ग्रुपवरून व्हायरल करण्यात आली. यानंतर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यास मदत झाली आणि अखेर खुनाचा छडा लागला.

हाती आलेल्या माहितीनुसार, सर्जापूर (ता. जावली) गावच्या हद्दीत एका शिवारात रात्री जेवणाच्या पार्टीत दारूच्या नशेत झालेल्या वादावादीत रुईघर (ता. जावली) येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी सर्जापूर येथील युवकास अटक केली आहे. किशोर श्याम निकम (वय- 29) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव रवींद्र बोराटे (वय- 25 ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मेढा पोलीस ठाण्यात सर्जापूर येथील एका शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. या अनोळखी इसमाची माहिती पोलीस पाटील यांच्या व्हाट्सअप ग्रुपवरुन व्हायरल करण्यात आली. त्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर लागलीच त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. या इसमाच्या मृतदेहावर काही ठिकाणी मार लागला असल्याने युवकाचा नक्की कशामुळे मृत्यू झाला, हे समजत नसल्याने मेढ्याचे सपोनि संतोष तासगावकर व कुडाळ पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे, हवालदार सनी काळे, हवालदार दिगंबर माने यांनी यांचा तपास केला.

तेव्हा गुरुवारी सर्जापूर गावच्या हद्दीत जेवणाची पार्टी झाल्याची माहिती समोर आली. या पार्टीत दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी वैभव बोराटे याने दांडक्याने किशोर याला मारहाण केल्याचे समोर आले. या मारहाणीत किशोर याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून संशयित आरोपी म्हणून वैभव बोराटे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तासगावकर करत आहेत.