सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गारठा काहीसा कमी झाला असून तरीही रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. जिल्ह्यात किमान तापमानात घट होत असून महाबळेश्वरात ७.५, अंशाची नोंद झाली आहे. या हंगामातील आतापर्यंतचे निच्चांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने पाचगणी, महाबळेश्वर परिसरात हुडहुडी भरली असून त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात यादरम्यान पारा एकदम खाली येतो. पण, यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चालला आहे. त्यामुळे चार दिवसांत किमान तापमानात दोन अंशाचा उतार आला आहे. महाबळेश्वर पाचगणी जावळी वाई शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवार शनिवार १० ते १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पण, शुक्रवारी, शनिवार, रविवार पहाटेच्या सुमारास शहरात ७ अंशाची नोंद झाली. त्यातच वातावरणात शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे.
शुक्रवारी ७ अंशाची नोंद झाली. हे या हंगामातील नीचांकी तापमानं ठरले. आणखी दोन दिवस तापमानात उतार राहिला तर महाबळेश्वरात दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागातील किमान तापमान १२ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी सहानंतरच थंडीला सुरुवात होते. रात्रभर थंडीची तीव्रता जाणवते, तर पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका पडत आहे. यामुळे सकाळी १०:०० वाजले तरी अंगातून थंडी जात नाही. दुपारच्या सुमारासही वाऱ्यामुळे थंडी जाणवत आहे.
हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज
उत्तर भारतात सक्रिय झालेला पश्चिमी चक्रवात शमल्याने तिकडून येणार्या शीतलहरींच्या प्रभावामुळे जिल्ह्यासह राज्यात मागील चार दिवस थंडीची लाट होती. मात्र, अचानक दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ शांत झाले असले तरी त्याचा परिणाम वातावरणावर जाणवत आहे. सोमवारी सातार्याचे किमान तापमान 21.5 तर महाबळेश्वरचे किमान तापमान 16.4 अंश होते. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशात ढगाळ हवामानामुळेअवकाळी पावसाची शक्यता आणखी दाट झाली आहे.
ढगाळ हवामानामुळे पिकांना किडीचा धोका
थंडी रब्बीतील पिकांना पोषक ठरत असले तरी ढगाळ हवामानामुळे मात्र पिकांवर रोगराईचा प्रादुभाव वाढतो. सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी आदि पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पिके जोमात आली आहेत. कांद्याच्या रोपांचे तरवे तयार आहेत. काही ठिकाणी कांदा लागण सुरु आहे तर काही ठिकाणी पेरणी केलेला कांदा उगवून जोर धरु लागला आहे. पहाटे पडणारे धुके झाडण्यासाठी कांदा उत्पादकांची धांदल उडत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला असून ढगाळ हवामान राहत आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे, गहू, ज्वारीवरीची पानेदेखील पिवळी पडतात. तर मिरच्या, पालेभाज्यांवर तुडतुडी, पाने खाणार्या आळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढणार आहे.