मायणीचे संशोधक प्राध्यापक अन् डॉक्टरने मिळविले मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मितीचे पेटंट

0
161
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती आणि याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहे. मूळ मायणीचे असलेले आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या राजाराम माने व डॉ.शोएब शेख यांनी हे पेटंट मिळविले आहे. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी ठरू शकतो, असा शोध प्रा.राजाराम सखाराम माने आणि डॉ. शोएब मोहम्मद शेख यांच्या टीमने लावत हे पेटंट मिळविले.

या शोधाचे पेटंट किंग साऊद विद्यापीठ, सौदी अरेबिया यांच्याकडून वित्तीय साहाय्य घेऊन प्राप्त केले आहे. पेटंट मिळविलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशांमध्ये, मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरियल तयार करणे, तसेच त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे. या शोधाच्या माध्यमातून प्राध्यापक माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभिनव पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तयार केलेल्या कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी करण्यात आला आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठी होऊ शकतो.

हायड्रोजन आधारित ऊर्जा प्रणालीचा वापर पर्यावरणास अनुकूल असून, त्याचा मोठा फायदा ऊर्जा क्षेत्रात होऊ शकतो. या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्राध्यापक कुंभारखाणे यांनी डॉ. माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या डॉ. माने आणि त्यांच्या गटाचे संशोधन बोअरच्या पाण्यातून मेटल हॅलाइड वेगळे करण्याच्या पद्धतीवर सुरू आहे.

या पदार्थाच्या कार्बनसोबत होणाऱ्या संयोगाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. हे संशोधन भविष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठू शकते. ज्यामुळे ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात नवा बदल होईल. डॉ. माने यांना भारतीय मराठी विज्ञान परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण संशोधक म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.