पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यातील माया मोरे यांना पदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्त (एसीपी) माया मोरे यांचा समावेश असून त्यांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. माया मोरे या मोरेवाडी-कुठरे (ता. पाटण) येथील असून आरेवाडी (ता. कराड) हे त्यांचे माहेर आहे. पदक जाहीर झाल्यााबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एमपीएसीद्वारे पोलीस दलात भरती

माया मोरे या 1992 मध्ये एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्या होत्या. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग 1993 ला माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात झाली होती. त्यानंतर त्यांनी विमानतळ सुरक्षा विभाग, कुलाबा, गुन्हे शाखा (समाजसेवा शाखा), पायधुनी पोलीस स्टेशन, नियंत्रण कक्ष, पनवेल, वाशी वाहतूक शाखा, एपीएमसी पोलीस ठाणे या ठिकाणी उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली. 2014 ला त्यांना वरीष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी शाखा, ठाण्यातील टीआरटीआय पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम केले.

पोलीस उपायुक्तपदी पदोन्नती

माया मोरे यांना 2023 मध्ये पोलीस उपायुक्त (डीवायएसपी) म्हणून पदोन्नती मिळाली. सध्या त्या यलो गेट विभागात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. समाजसेवा शाखेत कार्यरत असताना त्यांनी कुंटणखान्यावर छापे मारून अनेक पीडित तरूणींची सुटका केली होती. अवैध धंद्यांवर धाडी टाकून कोट्यवधी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. वाहतूक शाखेची धुरा असताना जनजागृतीबरोबरच 45 हजाराहून अधिक खटले दाखल करून शासनाला मोठा महसूल मिळवून दिला होता.

अंमली पदार्थ विरोधी मोठ्या कारवाया

एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक असताना माया मोरे यांनी अंमली पदार्थ विरोधी मोठ्या कारवाया केल्या होत्या. या मोहिमेत त्यांनी 14 आरोपींना अटक करत अंमली पदार्थांच्या रॅकेटचे कंबरडे मोडले होते. पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत 161 हून अधिक पारितोषिके, प्रशस्तीपत्रे मिळाली आहेत. दिल्लीच्या तत्कालिन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते प्राईड ऑफ इंडिया अ‍ॅवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

अनेक पुरस्कारांनी गौरव

माया मोरे यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबई डॅशिंग महिला अधिकारी पुरस्कार, कराडच्या विठामाता विद्यालयाचा स्मृती पुरस्कार, सावित्रीच्या लेकी, झाशीची राणी पुरस्कार, समाजरत्न, सुरूची स्त्री शक्ती पुरस्कार, वुमेन अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड, क्रीडा भूषण, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा या पुरस्कारांबरोबरच त्यांना 2021 साली पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह मिळाले आहे. अनेक वाहिन्यांवरील कार्यक्रमात देखील त्यांचा सहभाग होता. होम मिनिस्टर, महाराष्ट्र सद्रक्षणाय, शौर्यगाथा, हॅलो सखी, नवरात्र उत्सव विशेष कार्यक्रम, व्यसनमुक्तीवर लघुपट, पथनाट्यासाठी त्यांना वाहिन्यांनी आमंत्रित केले होते.