कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काले येथे श्री व्यंकनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळ व कराड तालुका कुस्ती संघटनेने नुकतेच निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रकाश बनकर विरूद्ध माऊली कोकाटे यांच्यातील प्रथम क्रमांकासाठी ५० मिनिटे काटा लढत झाली. अखेरीस पंचांनी गुणावर निकाल जाहीर केला. त्यानुसार माऊलीने प्रकाशवर गुणांची कमाई करत मैदान मारले. आणि तो २ लाखाच्या इनामाचा मानकरी ठरला.
माऊलीला चंद्रभागा रुलर डेव्हलपर्सचे मालक दिपकशेठ लोखंडे यांच्यावतीने दोन लाख इनाम देण्यात आले. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या प्रेरणेने व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती मल्ल व शौकीनांची मांदियाळी पहायला मिळाली.
दुपारी 4 वाजता मैदानाचे पूजन झाल्यानंतर कुस्त्यांना प्रारंभ झाला. मैदानात सुमारे १०० चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर, मनोहर शिंदे, जयसिंगराव कदम, प्रा. धनाजी काटकर, हिंदकेसरी संतोष वेताळ, प्रदिप पाटील, निवास थोरात, नरेंद्र पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, बाजार समितीचे सभापती विजय कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, संचालक प्रकाश पाटील, सतीश इंगवले, संभाजी काकडे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुभाषराव पाटील, बंडामामा रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, जयकर खुडे यांच्यासह पैलवान नानासाहेब पाटील मित्रमंडळातील पदाधिकऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात असणारे आ. पृथ्वीराज चव्हाण व कोल्हापूर येथील ऊस आंदोलनात व्यस्त असलेल्या माजी खा. राजू शेट्टी यांनी पैलवान नानासाहेब पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मैदानास शुभेच्छा दिल्या.
प्रथम क्रमांकाची कुस्ती उदयसिंह पाटील, दिपकशेठ लोखंडे, संयोजक पैलवान नानासाहेब पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. ही लढत आठ वाजून नऊ मिनिटांनी सुरू झाली. सुरुवातीस दोघांनी एकमेकांच्या कुस्तीचा अंदाज घेतला. दोन मिनिटात डाव – प्रतिडाव सुरू झाले. पाय लावून घिसा डाव लावत माऊलीने प्रकाशवर ताबा घेतला. त्यातून निसटून प्रकाशने माऊलीचे डाव उधळले. या दोघात ४५ मिनिटे कुस्ती सुरू होती. अखेरीस पंचांनी गुणांवर कुस्ती करण्याचे सांगितले. माऊलीने गुणांची कमाई करत कुस्ती जिंकली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पैलवान बंडा पाटील यांना कुस्तीभुषण, संतोष वेताळ यांना आदर्श वस्ताद, अनिल कचरे यांना कुस्तीप्रेमी, डॉ. सुधीर जगताप यांना कोरोना यौद्धा, संग्राम पवार यांना आदर्श सरपंच, डॉ. नरेंद्र माळी यांना आदर्श उद्योजक, बाबासाहेब बागल यांना युवा उद्योजक व नितीन ढापरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ईश्वरा पाटील व सुरेश जाधव यांनी समालोचन केले.
अशा झाल्या कुस्त्यांच्या लढती
गजानन आवळकर यांच्यावतीने झालेल्या दिग्विजय जाधव विरूद्ध पृथ्वीराज पवार यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पृथ्वीराज जखमी झाल्याने दिग्विजय विजयी झाला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या हॉटेल कोकण ग्रुपच्यावतीने झालेल्या गौरव हजारे विरूद्ध दत्ता बनकर यांच्यातील कुस्तीत गौरव विजयी झाला. चौथ्या क्रमांकाची सतीश वाळके यांच्यावतीने झालेली विकी थोरात विरूद्ध अक्षय माळी यांच्यात विकी विजयी झाला. त्यापुढील पंकज पाटील यांच्यावतीने आण्णा पाटील विरूद्ध विजय बिचुकले यांच्यातील कुस्तीत विजय जिंकला. सचिन पाचुपते यांच्यावतीने पृथ्वीराज पाटील विरूद्ध अतुल पाटील यांच्यात पृथ्वीराज विजयी झाला, तसेच नंदकुमार साळुंखे यांच्यावतीने अविराज चव्हाण विरूद्ध वैभव भिंगारे यांच्यातील लढतीत अविराज विजयी झाला.