सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये ओपन”पणे सुरू असलेला मटका क्लोज होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. “ओपन जेवू देईना; क्लोज झोपू देईना” अशी मटका शौकिनांची अवस्था झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या “तुंबड्या” भरल्याने राजरोसपणे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका फोफावल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मटक्याचा व्यवसाय थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी नागठाणे परिसरातील जनतेतून होत आहे
बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी बाजारपेठ व व्यापारी उलाढाल मोठी असलेली अनेक सधन गावे आहेत. या गावात व्यवसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. पण गेल्या काही वर्षापासून बंद झालेला मटका पुन्हा राजरोसपणे सुरु होऊन मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटका बहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसर मटका राजरोसपणे सुरू असताना पोलीस किरकोळ कारवाई करत असतात व पुन्हा 4 दिवसांनी मटका पुन्हा चालू होतो, पण पोलीस कायमस्वरूपी मटका बंदची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
बोरगाव पोलीस स्टेशनच्या कारभार्यांच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे मटका व्यवसाय खोपवल्याने आज अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानांही कुठल्याही प्रकारचे अंकुश अवैध व्यवसायावर लावण्यात येत नसल्याचे दिसत आहे.
काही वर्षांपूर्वीही मटक्याला असेच पेव फुटले होते पण मटका एजंट वरील वारवार झालेल्या कारवाई मुळे मटका “क्लोज” झाला होता, पण आता पुन्हा एकदा बंद झालेला मटका खुल्या व छुप्या पद्धतीने सुरू झालेला आहे.राजरोसपणे सुरू असलेल्या मटक्याची साधी चाहूलसुध्दा पोलीसांना कशी लागत नाही, अशी चर्चा परिसरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणारे मटका व्यवसाय वकायमस्वरूपी क्लोज करावेत व पोलिसांच्या खाबुगिरीला ही आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.