मसूर ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा बदलला लूक; अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे झाले चित्रीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । इंग्रज राजवटीतील ब्रिटिशकालीन असणारे रेल्वे स्थानक कराड तालुक्यातील मसूरमध्ये आहे. या रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरण करण्यात आले आहे. कराड तालुक्यातील मसूरच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा लूक बदलण्यात आला असून जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. अजूनही दगडी व भक्कम रेल्वे स्थानकाचे बांधकाम असल्येल्या या इमारतीच्या बाजूलाच सर्व सोयींनीयुक्त प्रशस्त व अद्यावत नवीन स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मही लांब व अद्ययावत स्वरूपात बांधण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाचा लूक बदलला आहे.

मसूर येतील रेल्वे स्थानकात नव्याने प्रवासी निवारा इमारतीची निर्मिती करण्याबरोबरच दुहेरी रेल्वे ट्रॅक, पश्चिम बाजूला नवा फलाट उभारण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ यासह अन्य राज्यांत जाण्यासाठी रेल्वे गाड्या थांबत असल्याने प्रवाशांचा रोजचा राबता आहे. दुहेरी रेल्वे ट्रॅकच्या कामासह अन्य कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. दुहेरी रेल्वे ट्रॅकमुळे एकावेळी दोन गाड्या पास होण्याबरोबरच रेल्वे स्थानकात गाड्या थांबणारही आहेत. रेल्वे क्रॉसिंगमुळे एक गाडी स्थानकातच थांबवावी लागत होती. ती अडचण आता दूर होणार आहे.

त्यात प्रवाशांची होणारी गैरसोय व वेळेची बचत होणार आहे. कोयना एक्स्प्रेस दोन, महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन, सातारा पंढरपूर- दादर, सह्याद्री एक्स्प्रेस यासह पॅसेंजर चार गाड्या व अन्य दोन अशा बारा रेल्वे गाड्या येथे थांबत असून, प्रवाशांची चांगली सोय होत आहे. राज्य मार्गावरून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी राज्य मार्गावर व रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

65 1

अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मसूरचे रेल्वे स्थानक जुन्या दगडी भक्कम बांधकामात भक्कमपणे अजूनही उभे आहे. स्थानकाचे प्रवेशद्वार रेखीव अर्धगोलाकार असल्याने मोहक दिसते. आजपर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या स्थानकावर झाले आहे. नवीन स्थानकाची उभारणी करण्यात आली असली, तरी जुनी इमारत जैसे थे ठेवण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

पुलाचे काम धिम्या गतीने

रेल्वे स्थानकावर एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी बांधण्यात येणारा पादचारी पूल प्रवाशांना सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे अपघातजन्य परिस्थिती उ‌द्भवणार नाही. मात्र, या पुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर कवठे, कोणेगावला जाण्यासाठी रेल्वे मार्गा खालून भुयारी मार्ग बांधला जात आहे.