साताऱ्याचा सज्जनगड हलगी-तुतारीचा निनादासह मशालोत्सवाने उजळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता.

दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता किल्ले सज्जनगड येथे सुरू झाला. यावेळी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त सज्जनगडावर दाखल झाले होते. आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी, एक दिवा शिवसमर्थ चरणी या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पहाटे साडेतीन वाजता भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

सज्जनगडावर पालखी दाखल झाल्यावर मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी असा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी परळी पंचक्रोशीतील युवक दाखल झाले होते. पालखीची मिरवणूक धाब्याचा मारुती मंदिर या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी चित्तथरारक असे आगीचे साहसी खेळ आयोजित करण्यात आले होते. अतित येथील मावळा प्रतिष्ठानतर्फे मर्दानी खेळ संपन्न झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती समोर ध्येयमंत्र खड्या आवाजात म्हणण्यात आला.