कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र व जवान सूरज मधुकर यादव हे आसाम दिवापूर येथे नागा बॉर्डरवर सेवा बजावत शहीद झाले. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र सूरज यादव हे चौदा वर्षांपूर्वी देशसेवेसाठी आर्मीत दाखल झाले होते. सुरज यांनी 2018 मध्ये शांतिदूत म्हणून आर्मीच्या वतीने आफ्रिकेला बजावली होती. जवान सुरज यांना सोमवारी दि. 19 रोजी आसाम दिवापूर क्षेत्रातील नागा बॉर्डर येथे धीमापूर याठिकाणी सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यु झाला. सदरील घटना सोमवारी सायंकाळी उशिरा घडली. दूरध्वनीवरून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास येरवळे गावी घरी माहिती मिळली.सेवा बजावत वीरमरण आल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांना मिळाली.
शहीद जवान सुरज यांचे वडील मधुकर यादव हेही एक माजी सैनिक होते. अत्यंत मनमिळावू व खिलाडू वृत्तीच्या असणाऱ्या सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनाने येरवळे व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ महिन्याचा मुलगा, बहीण असा परिवार आहे.