शहीद जवान वैभव भोईटेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात राजाळेत अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान वैभव संपतराव भोईटे हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरा त्यांचे. जन्मगाव असलेल्या राजाळे, ता. फलटण येथे दाखल झाले.या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी भरत बोडरे, बीड जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, राजाळेच्या सरपंच स्वाती दौंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे यांनी शहीद जवान वैभव भोईटे यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

शहीद वैभव भोईटे यांचे वडील संपतराव भोईटे यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. लडाख येथे देशसेवा बजावत असताना झालेल्या अपघातात वैभव भोईटे शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पती, पत्नी व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.