कराड प्रतिनिधी । कारगिलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्यदलातील इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील नायब सुभेदार जवान शंकर बसाप्पा उकलीकर हे शहीद झाले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज वसंतगड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीच्यावतीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. यानंतर शहीद जवान शंकर उकलीकर यांची मुलगी स्वरांजली व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी वसंतगड येथे खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिह पाटील, सैन्य दलातील मेजर ए. बी. थापा, मधुकर चव्हाण, वाय. जी. वारले, लेफ्टनंट जे. एस. कदम, लेफ्टनंट अय्याप्पा, उत्तुरकर, गाडे, प्रशांत कदम, कॅप्टन मनी राम शर्मा, बाळासाहेब लांवड, लेफ्टनंट कमांडर जाधव, सुभेदार देशमुख, संतोष सुर्वे, एस. एम. शिंदे, सोपान नलवडे, सुनिल सासवे, एस. टी. यादव, बी. टी. पटवर्धन, सुभेदार अनिल मोरे, हवालदार जितेंद्र सुर्वे, यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकारी व आजी माजी सैनिकांनी शहीद जवान शंकर उकलीकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
हुतात्मा नायब सुभेदार शंकर उकलीकर अनंतात विलीन; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कराड तालुक्यातील विविध मान्यवरांनी लावली उपस्थिती
पहा Video pic.twitter.com/Q4CCgFu1wE— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 13, 2023
पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर पत्नी पूजा, मुलगी स्वरांजली, आई सुशीला व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद जवान शंकर उकलीकर यांची मुलगी स्वरांजली व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
विजयदिवस चौकात मान्यवरांकडून अभिवादन
कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगडचे नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव तेथून पुणे विमानतळावरुन आज शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता लष्कराच्या वाहनातून कराड येथील विजय दिवस चौकात आणण्यात आले. यावेळी या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तहसीलदार विजय पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या वतीने शहीद जवान उकलीकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कराडपासून वसंतगडपर्यंत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी
कराड येथे शहीद जवान शंकर उकलीकर यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर त्यांना शहरातील विजयदिवस चौक, दत्त चौक, कोल्हापूर नाका येथे कराड शहरातील नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव वाहनातून वसंतगडकडे रवाना झाले. वसंतगड येथे जात असताना वारुंजी, विजयनगर, सुपने, आबईचीवाडी या ठिकाणी व ठिकठिकाणी ग्रामस्थ, महिलांनी व तरुणांनी शहीद जवान उकलीकर यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.