सातारा प्रतिनिधी । कोरेगांव तालुक्यातील बोरगांव गावचे सुपुत्र व भारतीय सैन्यदलातील जवान तुषार राजेंद्र घाडगे यांना अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा बजावत मंगळवारी वीरमरण आले. त्यानंतर वीर जवान तुषार घाडगे यांच्यावर बोरगाव येथील जन्मगावी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथे तुषार घाडगे यांचा जन्म झाला. प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तुषार घाडगे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेत ते सैन्यदलात भरती झाले. सैन्यदलात भरती झाल्यानंतर जवान तुषार घाडगे हे 116 RCC मध्ये अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. यावेळी त्याठिकाणी त्यांना मंगळवारी वीरमरण आले.
जवान तुषार घाडगे यांना अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आल्याची माहिती सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. दरम्यान, वीर जवान तुषार घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अरुणाचल प्रदेश येथून हवाईमार्गाने साताऱ्यात आणण्यात आले. तेथून पुढे रुग्णवाहिकेद्वारे बोरगाव येथे आणण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी वीर जवान तुषार घाडगे यांचे पार्थिव त्यांच्या गावी बोरगावात दाखल कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर विविध फुलांनी सजविलेल्या वाहनातून वीर जवान घाडगे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो युवक, नागरिकांच्या वतीने यावेळी ‘भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. बोरगाव येथील स्मशानभूमीत वीर जवान तुषार घाडगे यांचे भाऊ विशाल राजेंद्र घाडगे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली. वीर जवान तुषार घाडगे यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.