कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी विजय विभुते, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, अतुल भोसले, धैर्यशील कदम यांनी शहीद जवान अनिल कळसे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी सुनिता, आई लिलावती, वडील दिनकर, भाऊ बाळासाहेब, सुनील, मुलगा आर्यन व मुलगी श्रद्धा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शहीद अनिल कळसे हे भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. मणिपूर येथे कर्तव्यावर असताना २१ डिसेंबर रोजी त्यांना वीरमरण आले.