सातारा प्रतिनिधी | छत्तीसगड येथे नारायणपूर विभागातील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत भूसुरुंगाचा स्फोट होऊन खंडाळ्यातील जवान अमर पवार हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव येण्यास उशीर झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील अमर पवार हे छत्तीसगड मधील नारायणपूर कॅम्पमध्ये असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन अमर पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह इतर 4 जवानांना रायपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. शहीद अमर पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधून शासनाचे चार्टर्ड विमान पाठवून पार्थिव पुण्यात आणण्यासाठी मदत केली. शहीद अमर पवार यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्यात दाखल झाले.
शहीद जवान अमर पवार यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सातच्या सुमारास खंडाळा येथे पोहोचणार आहे. खंडाळ्यातून बावडा येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात येणार आहे. तेथे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा प्राथमिक शाळेजवळील मैदानापर्यंत नेण्यात येणार असून येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.