सातारा प्रतिनिधी | देशासाठी हौतात्म्य पत्करण्याच्या सातारा जिल्ह्याच्या शौर्यशाली परंपरेत बावडा (ता. खंडाळा) येथील हुतात्मा जवान अमर शामराव पवार यांच्या कारकिर्दीने आणखी एक नोंद झाली. काल सोमवारी उपस्थित जनसागराने दिलेल्या ‘अमर रहे, अमर रहे अमर पवार अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांसह भारावलेल्या वातावरणात आणि शासकीय इतमामात बावडा (ता. खंडाळा) येथील हुतात्मा जवान अमर पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी हुतात्मा जवान अमर यांच्या पार्थिवाचे कुटुंबीय, नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी पत्नी कोमल व आई सुषमा यांनी फोडलेला हंबरडा हृदयाला भेदणारा होता. त्यानंतर त्यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले. या अंत्ययात्रेला गावातील व तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी होती. दुतर्फा काढलेल्या फुलांच्या रांगोळीवरील रस्त्याने ही अंत्ययात्रा मिटकॉन मैदानापर्यंत पोचली. तेथे फुलांनी सजवलेले स्टेज बनविण्यात आले होते.
तेथेच हुतात्मा जवान अमर पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स व जिल्हा पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी आयटीबीपीचे एएसआयजीडी श्री. रामहरी कुंदे व हवालदार मंगेश यादव यांच्या नेतृत्वाखाली बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून शोकशिस्त व सलामी शिस्त देण्यात आली, तर सातारा पोलिसांकडूनही अशीच मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार मकरंद पाटील, तहसीलदार अजित पाटील, बकाजीराव पाटील, शंकरराव गाढवे, नितीन भरगुडे-पाटील, पुरुषोत्तम जाधव, विराज शिंदे, पोलिस निरीक्षक सुनील शेळके, विविध गावचे सरपंच यांच्यासह हजारो नागरिकांनी हुतात्मा जवानाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. एनसीसी पथक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावडा येथील जवान अमर पवार हे शनिवारी (ता. १९) छत्तीसगड येथील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हुतात्मा झाले. त्यांच्या मागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा, आई, वडील व बंधू असा परिवार आहे. ते नुकतेच गणेशोत्सव काळात सुटीवर आले होते. त्यानंतर पुन्हा कार्यरत झाल्यावर थोड्याच दिवसांत ही दुर्दैवी घटना घडली.
जवान अमर पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बावडा येथेच झाले होते. त्यानंतर ते २०१० मध्ये इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (४४ यू वाहिनी आयटीबीपी) बेळगाव येथे भरती झाले होते. ते सध्या ५३ बटालियन आंध्रप्रदेश येथे कार्यरत होते. १५ वर्षे देशसेवा झालेल्या अमर पवार यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करून नावाप्रमाणेच कार्याची नोंदही अमर केल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.