विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू, पार्थिवावर उद्या कोल्हापुरात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील व्यावसायिकाची विवाहित मुलगी सौ. ऐश्‍वर्या राजेंद्र देशमाने-भिवटे (वय २९) यांचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. त्या आयटी इंजिनिअर होत्या. कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र पार्थ यांच्याशी ऐश्‍वर्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेमुळे सातारा आणि कोल्हापुरातील देशमाने-भिवटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

एप्रिलपासून नोकरीत रुजू होणार होत्या

सातारा येथील व्यावसायिक राजेंद्र देशमाने यांची मुलगी ऐश्वर्या हिचा तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र पार्थ भिवटे यांच्याशी विवाह झाला होता. अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील डेट्राईट शहरात असलेल्या फोर्ड कंपनीत ते कार्यरत होते. पत्नी ऐश्‍वर्यासह ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. पत्नी ऐश्‍वर्याने देखील अमेरिकेत नोकरीसाठी आवश्‍यक असणारा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. एप्रिल महिन्यापासून त्या नोकरीमध्ये रुजू होणार होत्या.

खरेदीला गेल्यानंतर कारचा भीषण अपघात

साताऱ्यातील देशमाने कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई पार्थ आणि मुलगी ऐश्‍वर्या हे रात्री खरेदीसाठी बाहेर पडले होते. डेट्रॉईट शहरातील एका चौकातून डावीकडे वळत असताना उजव्या बाजूने आलेल्या कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की, चालकाच्या बाजूला बसलेल्या सौ. ऐश्‍वर्या यांचा जागीच मृत्यू झाला, तिचे पती पार्थ हे जखमी झाले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

पार्थिवावर गुरूवारी कोल्हापुरात अंत्यसंस्कार

ऐश्‍वर्या देशमाने-भिवटे यांचे पार्थिव बुधवारी रात्री साताऱ्यातील देशमाने यांच्या शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. १४) सकाळी सासरी कोल्हापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे देशमाने आणि भिवटे परिवारावर शोककळा पसरली असून सातारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.