यंदा 51 मुहूर्त; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !; 18 नोव्हेंबरपासून विवाह इच्छुकांच्या डोक्यावर पडणार अक्षता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नुकताच दिवाळीचा सण झाला. सर्वांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. दिवाळीनंतर तुलसी विवाह जवंजाळ आला असून आपल्याकडे तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्नाचे बार उडण्यास प्रारंभ होतो. लग्नाचे मुहूर्त ही त्याच पद्धतीचे असतात. यंदा १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी असून दुसऱ्या दिवसांपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार आहे. पुढील आठ महिन्यांत विवाहासाठी ५१ मुहूर्त आहेत. त्यामुळे या मुहूर्तावर शुभमंगल सावधान’ सह मंगलाष्टका ऐकायला मिळणार आहे.

यावर्षी २१ मुहूर्त फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांत आहेत. विवाहासाठी इच्छुक असलेल्यांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ होणार आहे. लग्न जुळलेल्यांच्या कुटुंबीयांनी आतापासून मंगल कार्यालये आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे, त्याअनुषंगाने विवाह इच्छुकांची व त्यांच्या कुटुंबीयांची तयारी जोमात सरू आहे.

उन्हाळ्यातील मुहूर्ताना सर्वाधिक पसंती

साधारणतः ग्रामीण भागात उन्हाळ्यातील मुहूर्ताना सर्वाधिक पसंती दिली जाते. मे महिन्यात शाळा महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे या दिवसांतील मुहूर्त साधण्यात येतात. गतवर्षी मे महिन्यात मोजकेच मुहूर्त होते. मात्र, यंदा नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यातच श्री होण्याची शक्यता आहे.

मंगल कार्यालयांची मागणी वाढली

विवाह सोहळा हा दोन कुटुंबांतील महत्त्वाचा आनंद सोहळा असतो. यासाठी प्रशस्त मंगल कार्यालयांना मागणी असते. पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणांना अधिक पसंती दिली जाते. धावपळ टाळण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. तर विवाह इच्छुक तरुण, तरुणींचे लग्नासाठी पाहणी कार्यक्रमास वेग आला आहे. विवाह सोहळ्यांमध्ये पाहुण्यांची गैरसोय होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते. श्रीमंत वर्गाकडून वातानुकूलित मंगल कार्यालय बुकिंग केले जात आहे. तर सर्वसामान्यांची पसंती कमी भाडे असलेल्या मंगल कार्यालयांना मिळत असल्याचे दिसत आहे.

फेब्रुवारी व मे मध्ये २१ मुहूर्त

यंदा नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात एकूण ५१ मुहूर्त आहेत. यापैकी फेब्रुवारीमध्ये १०, मे महिन्यात ११ मिळून एकूण २१, असे मुहूर्त आहेत. सर्वात कमी मुहूर्त डिसेंबर, मार्च व जून महिन्यात आहेत.

यावर्षीचे विवाह मुहूर्त

१) नोव्हेंबर महिना : दि. १८, दि. २२, दि. २५, दि. २७

२) डिसेंबर : दि. १, दि. २, दि. ५, दि. ६, दि. ११

३) जानेवारी : दि. १६, दि.१९, दि. २०, दि. २३, दि. २४, दि. २९, दि. ३०

४) फेब्रुवारी : दि. २, दि. ३, दि. ७, दि. १६, दि. १९, दि. २०, दि. २१, दि. २३, दि. २६

५) मार्च : दि. २, दि. ३, दि. ६, दि. ७

६) एप्रिल : दि. १६, दि. १८, दि. २०, दि. २१, दि. २३, दि. २५, दि. ३०,

७) मे : दि. १, दि.७, दि. ८, दि. ९, दि. ११, दि. १८, दि. १९, दि. २२, दि. २३, दि. २५, दि. २८

८) जून : दि. १, दि. २, दि.३, दि. ४.