कराड प्रतिनिधी । कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात मंगळवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी राजभाषा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रतिसाद दर्शविला.
यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांना म्हणी पाठांतर स्पर्धेअंतर्गत विशेष अशा निवडक 100 म्हणी देण्यात आल्या व त्यांच्या पाठांतर करून त्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या १०० इंग्रजी भाषिक शब्दांना पर्यायी मराठी परिभाषिक शब्द देवून विद्यार्थ्यांची शब्द पाठांतर स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थी व कुटुंबातील व्यक्तींचे हस्ताक्षर संकलन हा अनोखा उपक्रम देखील घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी – पालकांनी एक परिच्छेद मराठी भाषेत लिहून हस्ताक्षर आणायचे व त्या विविध प्रकारचे हस्ताक्षरांचे संकलन करण्यात आले. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी मराठीत लेखन केले. विशेषत: यामध्ये आजी व आजोबांचा मोठा सहभाग होता.
यावेळी मराठी भाषा समृद्धी कार्यक्रम अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली जोशी, समन्वयक श्री.विजय कुलकर्णी, मराठी भाषा विषय शिक्षक सौ.विद्यादेवी जाधव, सौ.स्वाती जाधव, श्री.अवधूत तांबवेकर यांनी सर्व उपक्रमांचे नियोजन केले. तर सौ.रुपाली तोडकर, सौ.सोनाली जोशी, श्री.प्रथमेश इनामदार यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान व लेखक म्हणून विचार’ याबाबत श्री. विजय कुलकर्णी यांनी माहिती दिली. श्री.प्रथमेश इनामदार यांनी ‘माझी भाषा – मराठी भाषा – माझा अभिमान’ यावर आपले विचार मांडले.
‘विधायकता वाचन पुरस्कार’चे वितरण
विधायकता वाचन पुरस्कार शाळेतील स्व.शिवराय तेलंग ग्रंथालय व सौ. शैलजा आणि श्री. मुकुंद सबनीस यांच्या वतीने दरवर्षी शाळेतील सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची कराड शहरातील उत्कृष्ट वाचक असणाऱ्या व्यक्तींकडून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांना ‘विधायकता वाचन पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी लहान गटात चि.शौर्य संतोष पवार ( इ.६ वी – तोरणा ) व मोठ्या गटात कु.वेदश्री मकरंद माळवदे ( इ.९ वी – सज्जनगड ) या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थांना बक्षीस म्हणून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रुपये ५०० रुपये रक्कमेची पुस्तके भेट म्हणून देण्यात आल्या. यासाठी परीक्षक म्हणून श्री.अरुणराव काकडे व श्री. दीपक कुलकर्णी यांनी विद्यार्थांच्या मुलाखती घेतल्या.
उत्तम वाचक शिक्षक पुरस्कार
सरस्वती शैक्षणिक संकुलातील शिक्षकांना जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील स्व.शिवराय तेलंग ग्रंथालयातील व वैयक्तिक स्तरावर सर्वाधिक पुस्तकांचे वाचन केल्याबद्दल ‘उत्तम वाचक शिक्षक पुरस्कार’ दिला जातो. शिक्षकांच्या ही त्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांवर आधारित मान्यवरांकडून मुलाखत घेतल्या जातात व निवड करून क्रमांक देण्यात येतात. यावर्षी श्री. राहूल मोरे ( प्रथम ), सौ.गौरी जाधव ( द्वितीय ), सौ.नीलिमा पाटील ( तृतीय ) या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कार स्वरूप आहे.
मराठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळा तसेच मराठी स्वाक्षरी
शाळेतील सर्वोत्कृष्ट हस्ताक्षर असणाऱ्या मराठी शिक्षिका सौ.विद्यादेवी जाधव यांनी शाळेतील हस्ताक्षर बाबतीत सुधारणा अपेक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवस रोज एक तास विशेष हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेतली. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, मान्यवर संचालक, सर्व शिक्षक व मराठी राजभाषा दिनाला शाळेत येणाऱ्या प्रत्येकाकडून शाळेच्या फलकावर मराठी भाषेत स्वाक्षरी करून घेण्यात येते व त्यांचे संकलन केले जाते.
कविता रसग्रहणसह घेण्यात आले महत्वाचे उपक्रम…
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला आवडलेल्या कवितेचे स्वतःच्या शब्दात रसग्रहण करणे व सादर करणे असाही उपक्रम घेण्यात आला. तसेच शाळेतील प्रत्येक वर्गातून एका गट याप्रमाणे प्रत्येक गटाची १०-१५ मी. अशी लहान व मोठ्या गटात अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लहान गटात इयत्ता ६ वी तोरणा व इयत्ता ७ वी सिंहगड या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मोठ्या गटात इयत्ता ८ वी वसंतगड या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. यावेळी सौ. रुपाली तोडकर व श्री.विजय कुलकर्णी यांनी अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण केले.