सातारा प्रतिनिधी | ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा (शिवजयंती) समावेश केल्याबद्दल साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. यामुळे महाराष्ट्राबाहेर कार्यरत असणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार आहे.
वर्षातून मिळतात 2 ऐच्छिक सुट्ट्या
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना दुसर्या परिशिष्ट सूचीमध्येही ऐच्छिक रजा मिळणार आहेत. परिशिष्टाच्या दुसऱ्या यादीतील सुट्ट्यांना प्रतिबंधित सुट्ट्या म्हणतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी, म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुट्टीचा समावेश करावा, अशी लोक भावना उदयनराजेंनी मांडली होती. त्यानुसार केंद्र सरकारने ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे.
छत्रपतींचा एकेरी उल्लेख दुरूस्त करणार
ऐच्छिक सुट्टीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’, असा झाला आहे. त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’, असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ती तात्काळ मान्य करून छत्रपतींचा आदरार्थी उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही दिली.
भूकंप संशोधन केंद्राच्या मुद्द्यावर चर्चा
जितेंद्र सिंह यांच्याकडे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यांचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्या विभागाशी संबंधित अनेक विषयांवर उदयनराजेंनी चर्चा केली. कराड तालुक्यातील हजारमाची येथे ६०० कोटी रुपये खर्चून भूकंप संशोधन केंद्र आणि अभ्यास विद्यापीठ उभारण्यात येत आहे. संशोधन केंद्राच्या अनुषंगाने देखील त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली.