सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे.
जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाने सतर्क राहावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर लक्ष ठेवून सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाने सज्ज राहण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.
पालकमंत्री देसाईंनी घेतली खा. उदयनराजेंची भेट
मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीबद्दलची माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समितीचे सदस्य या नात्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला देण्यात येणार्या सवलतींविषयी पालकमंत्र्यांनी उदयनराजेंना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख देखील उपस्थित होते. मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या प्रश्नावर शासनास सहकार्य करावे, असे शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.