कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या १७ नोव्हेंबर रोजीच्या सभेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे मराठा बांधव गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आणि गोपनीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची काही समन्वयकांना बुधवारी रात्री दत्त चौकात गाठले. त्यांची मनधरणी केली. त्यामुळे आज मराठा समन्वयक काय पवित्रा घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला जाण्याच्या तयारी आणि नियोजनासाठी सर्किट हाऊसमध्ये बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या बैठकीत खरी चर्चा ही पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात होणार आहे.
१४ समन्वयकांवर झाला आहे गुन्हा दाखल
मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेदिवशी मराठा बांधवांनी प्रशासनाला सहकार्य केले. सभा शांततेत पार पाडली. त्यानंतर १९ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात संबंधितांना कसलीही सूचना दिली नाही. थेट नोटीसा पाठवल्या. बहुतांश जणांनी नोटीस स्वीकारली नाही. यासंदर्भात सोमवारी (दि. २५) चौकशीला बोलविले होते. मात्र, नोटीसा घेणारे चौकशीला गेले नाहीत.
जमावाने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय
पोलिसांच्या या कारवाई नंतर मराठा बांधवांनी गुरूवारी (दि. २८) एकत्र येऊन जमावाने कराड शहर पोलीस ठाण्यात जाऊन आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री पोलिसांनी काही समन्वयकांना दत्त चौकात गाठले. त्याठिकाणी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला.
मराठा बांधव सर्किट हाऊसमध्ये जमणार
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्हॉट्सॲपवर मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. गुरूवारी मराठा बांधवांनी सर्किट हाऊसमध्ये एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा बांधव आज काय पवित्रा घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.