सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाबाबत मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी काल सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी सभा घेतली. मात्र, जरांगे-पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. याचेच पडसाद काल सातारा जिल्ह्यातही जाणवले. सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुली येथे शनिवारी सायंकाळी मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येत छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. छगन भुजबळ मुर्दाबाद… अशा घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तरुणांनी दहन केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मराठा योध्दा मनोज जरांगे- पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातून उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत आहे. त्यांनी केलेल्या मागण्याबाबत सरकारने गांभीयन घेतल्यामुळे आता आरक्षण हे द्यावेच लागणार आहे. हे स्पष्ट होवू लागल्याने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बेतालपणे मंत्री छगन भुजबळ हे वक्त्व्य केले.
त्या घटनेचा निषेध माहुली येथे तरुणांनी एकत्र त्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून “एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव” अशा घोषणा देत छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावली.
भुजबळ काय म्हणाले होते?
अंबड शहरात पाचोड मार्गावरील धाईतनगरात शुक्रवारी ओबीसी – भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव या सभेला उपस्थित होते. यावेळी ओबीसी नेते, तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणाले कि, ‘‘याद राखा..! पुन्हा माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नका, सतत ओबीसी आमच्या हक्काचे खातात, असे बोलता, आम्ही तुमचे खातो का?’’ २७ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण कसे? असा प्रश्न जरांगे उपस्थित करतात. त्यावर मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.