सातारा प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत उद्या शनिवारी दि. 14 होणार्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेला सातारा जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. एकट्या फलटण तालुक्यातून 50 ट्रक-टेम्पो, 100 बसेस, 200 कार आणि 300 दुचाकी असा ताफा घेऊन 5 हजार तरूण सभेला जाणार असल्याची माहिती फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण केले होते, राज्य सरकारने 30 दिवस मुदत मागितली होती, ती वाढवून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली. आता शनिवार, दि.14 रोजी अंतरवाली सराटी येथे त्यांची भव्य सभा होत आहे. या सभेला मोठ्या संख्येने जाण्यासाठी फलटण शहर आणि ग्रामीण भागात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या. सभेला सुमारे 5 हजार तरूणांची फौज जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.
पहाटे 4 वाजता होणार मार्गस्थ
सभेला जाण्यासाठी मराठा बांधव आपापल्या गावातून पहाटे 3 ते 4 वाजता निघणार आहेत. प्रत्येक जण आपल्या बांधवांची काळजी घेणार आहे. प्रत्येक वाहनावर चालकाच्या डाव्या बाजूला भगवा झेंडा लावण्यात येणार आहे. प्रत्येक जण दोन वेळेचा किंवा दोन व्यक्तींचा जेवणाचा डबा सोबत घेणार आहे. प्रत्येक वाहनात पाण्याचे जार किंवा पाण्याच्या बाटल्या असणार आहेत. अशा जय्यत तयारीने मराठा बांधव मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेला रवाना होणार आहेत.
गिनीज बुकमध्ये होणार नोंद?
आंतरवाली सराटीत होणार्या सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मराठा बांधवांच्या सभेची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होण्याची शक्यता असून गिनीज बुकचे प्रतिनिधी इंग्लंडवरून येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाला मिळाली आहे. स्वत:चा संसार उघड्यावर टाकून मराठा समाजासाठी रक्ताचे पाणी करणार्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी आपण आपला एक दिवस द्यायचा आहे, असे आवाहन फलटण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा बांधवांना करण्यात आले आहे.