सातारा प्रतिनिधी । मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण मंगळवार, दि. २६ रोजी स्थगित करण्यात येणार आहे. यानंतर आरक्षणाची पुढील दिशा जानेवारी महिन्यात ठरणार असून मुंबई येथे सर्व मराठा बांधवांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केल्या जाणाऱ्या उपोषणस्थळी सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली.
सातारा येथे सुरु असणाऱ्या उपोषणस्थळी समन्वयकांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. तरीही मराठे शांत आहे. परंतु, आता आमचा संयम सुटला आहे. आजपर्यंत गावोगावी तसेच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने झाली. तरीही राज्यकर्त्यांना जाग आली नाही. यापुढील आमरण उपोषण मुंबईत होईल. मग शासनाला पळता भुई थोडी होईल. मराठा समाजाच्या समनव्यकांच्या हातातील आंदोलन जनतेने हातात घेतले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतांच्या राजकारणासाठी मराठ्यांचा वापर होत आहे. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षणबाबत ठोस भुमिका घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले.
मराठा आंदोलनात घरची, शेतीची कामे सोडून मराठा बांधव आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन आता मंगळवार, दि. २६ पासून स्थगित करत करण्यात येत आहे. एका बालिकेच्या हातून सरबत घेवून हे आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा जानेवारीत ठरेल. ज्याप्रमाणे विक्रमी संख्येने साताऱ्यात मोर्चा काढला, त्याचपद्धतीने विक्रमी मोर्चा मुंबईत निघेल. साताऱ्यातून मोठ्या संख्यने मराठा बांधव चालत मुंबईला जाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांच्यावतीने देण्यात आली.