कराड प्रतिनिधी | अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काल कराड तालुका मराठा बांधवांनी दत्त चौकात आंदोलन केले. त्यानंतर आज तालुक्यातील कार्वे गावातील ग्रामस्थांसह मराठा बांधवांनी एक दिवसाचे उपोषण करीत पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यासाठी शाळकरी मुलांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावली तर ग्रामस्थांनी देखील गावातील दुकाने बंद ठेवत पाठिंबा दिला.
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे याकरिता कार्वे गावात उपोषणास बसलेल्या युवकांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अँड. दीपक थोरात, शेतकरी संघटनेचे प्रमुख जनार्दन देसाई, माजी सरपंच वैभव थोरात, युवा नेते संताजीराव थोरात, भास्कर थोरात, सचिन देसाई यांच्यासह माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती लावली.
कार्वे ता. कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून मराठा बांधवांनी ‘आमच्या हक्काचं मराठा आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे, असे म्हणत एक दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी उपोषणकर्ते म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता विविध संघटना एक मराठा लाख मराठा अशा मागणीने हा प्रश्न शासन दरबारी आहे. मात्र, या आरक्षण संदर्भात कसलीही जलद भूमिका, धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने आरक्षणाचा चेंडू कोर्टाच्या दरबारात टाकला असून मराठ्यांना आरक्षण देतो असे वारंवार आश्वासन सत्ताधारी सरकार देत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान केला आहे की जोपर्यंत मराठा मावळ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कधी स्वस्त बसणार नाही. हे आंदोलन कायम स्वरूपी चालू ठेवणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून कार्वे येथील मराठा बांधवांनी उपोषण सुरू केले आहे.