कराड प्रतिनिधी । मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर गुन्हा दाखल करून नोटीस काढण्यात आल्यामुळे गुरूवारी जमावाने पोलीस ठाण्यात जाऊन जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी मराठा बांधवांची सर्किट हाऊस मध्ये चर्चा करून कारवाईच्या संदर्भातील संभ्रम दूर केल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जेल भरोचा निर्णय स्थगित केला.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल करून आता त्या संदर्भात नोटीस बजावण्यात आल्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले होते गुरुवारी जमावाने जाऊन जेलभरो करण्यात येणार होता. तथापि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी सर्किट हाऊस मध्ये मराठा बांधवांची भेट घेतली. यावेळी मराठा बांधवांनी आपल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. राजकीय दबावातून ही कारवाई केली गेली आहे का? असा सवाल देखील केला.
मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कायदेशीर नियमानुसार ही कारवाई झाल्याचे सांगितले. कारवाई करताना कोणाबद्दलही आकस मनात ठेवलेला नाही. मराठा बांधवांनी यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये प्रशासनाला अतिशय चांगले सहकार्य केले आहे. आम्ही देखील दबावाने अथवा सोडू बुद्धीने कोणतीही कारवाई केलेली नाही. मराठा बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती केली.
मुंबईला जाण्याच्या नियोजनाची बैठक लवकरच
आरक्षण एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला जाण्यासाठी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाची बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे. त्या बैठकीत मुंबईच्या आंदोलनाला कसे जायचे याचे रूपरेषा ठरणार आहे. कराड तालुक्यातील मराठा बांधवांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे.