सातारा प्रतिनिधी | अंतरवाली सराटी, ता. अंबड जि. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. याला फलटण येथेही मोठा प्रतिसाद मिळाला. येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणकरांनीही शंभर टक्के दुकाने बंद ठेवत ओबीसीतुन टिकणारे आरक्षण मिळत नाही तोवर कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा फलटण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांबाबत घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ फलटणला आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करुन शपथ घेतली. यानंतर सर्व समाज बांधवांनी तेथुन क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे पायी जात चक्का जाम आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी आंदोलकांनी चौकामध्ये चारही बाजुने ठिय्या मांडून वर्दळीच्या चौकातील वाहतुक रोखून धरली.
मराठा आंदोलकांवर झालेल्या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करुन परखड भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधींनो मराठ्यांना आरक्षणासाठी तुम्ही घरात बसुन उंबरठा ओलांडणार नसेल तर पुढील काळात तुम्हाला तुमची जागा समाज दाखविल्याशिवाय राहणार नाही. आता आणखी अंत पाहू नका, आमचं ठरलयं, आरक्षणाच जमत नसेल तर घरात बसा, असे इशारे आंदोलकांनी बोलताना दिले.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देण्यात आल्यानंतर शांततापुर्ण सुरु असलेल्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. दरम्यान, आजच्या चक्का जाम आंदोलनाचे प्रमुख केंद्र क्रांतीसिंह नाना पाटील चौक होते. परंतू, काही आंदोलकांनी गनिमी काव्याने शहरातील अनेक चौकांमध्ये ठिया मांडला. त्यामुळे तेथील वाहतुक जागेवरच थांबली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील सर्व व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवल्याने फलटण शहर शंभर टक्के बंद राहिले.