कराड प्रतिनिधी | आम आदमी पार्टीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दमदार एन्ट्री केली आहे. रहिमतपूर- देशमुखनगर (ता. कोरेगाव) येथील किरण पाटील आणि पंचक्रोशीतील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संदीप देसाई, राज्य सहसचिव अविनाश देशमुख आणि सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. धीरजसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
रहिमतपूर हे कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रमुख ठिकाण आहे. अशा ऐतिहासिक शहरातून ‘आप’ची विचारधारा संबंध जिल्ह्यात जोमाने वाढेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष महाराष्ट्रात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास संदीप देसाई आणि ॲड. धीरजसिंह जाधव यांनी व्यक्त केला.
पक्ष प्रवेशावेळी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा कोषाध्यक्ष विजयकुमार धोतमल, जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील, महासचिव निवृत्ती शिंदे, कोरेगाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष खंदारे, माण तालुकाध्यक्ष विक्रम काळेल, अब्बास शिकलगार, सुरेश पाटील, स्वप्नील देटके, जयवंत माने यांच्यासह रहिमतपूर, देशमुखनगरमधील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.