कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार; चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा मनोज माळींचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानच्या माध्यमातून प्रती लाभार्थी व्यक्तीला ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र, कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यामध्ये काळाबाजार केला जात आहे. काळाबाजार कारणाऱ्या दुकानदारांची चौकशी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा थेट इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते मनोज माळी यांनी तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे दिला.

मनोज माळी यांच्यावतीने काल शुक्रवारी तहसीलदार विजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिव शिवाजी चव्हाण, अशोक पवार, प्रवीण शिंदे, बंटीभाऊ मोरे, श्रीकांत यादव, जयवंत मोरे, विशाल दबडे, प्रफुल खरात, आशुतोष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मनोज माळी म्हणाले की, राज्य शासनाकडून कमी धान्य पुरवठा झाल्याचे सांगत स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थीने कमी धान्य देत आहेत. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांना विचारले असता तालुका पुरवठा विभागाचे सूचनेप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगत आहेत तसेच वाटप केलेल्या धान्याची पावती देत नाही.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची येत्या पंधरा दिवसात सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा आपल्या दालनासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे माळी यांनी निवेदनाद्वारे म्हंटले आहे.