कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभाग येथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून धान्य कमी प्रमाणात वाटप केले आहे. याबाबतची तक्रार दि. 27 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे केली होती. मात्र, तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दि. १५ डिसेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न केल्यास धरणे आंदोलन करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मनोज माळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
कराड शहरात पुरवठा विभागातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेल्या गैरकारभाराबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मनोज माळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी भानुदास डाईंगडे, बंटी मोरे, अक्षय चव्हाण श्रीकांत यादव, संदेश नलवडे, प्रितेश माने, इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. यावेळी माळी म्हणाले की, कराड तालुका पुरवठा विभागाच्या वतीने ऑक्टोंबर २०२३ मध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता कमी धान्य वाटप केले बाबत तहसीलदार विजय पवार यांना २७.१०.२०२३ रोजी निवेदन दिले होते. त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
तरी ऑक्टोबर महिन्यात कराड तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता कमी धान्य वाटप करण्यात आले होते या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारावर कडक कारवाई करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक १५ डिसेंबर रोजी कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम्ही जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांना निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती माळी यांनी दिली.