सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाबाबत लढणारे मनोज जरांगे – पाटील यांनी आज सातारा येथे स्वागत सभेस उपस्थित राहून मराठा बांधवांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी जरांगेंना तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर उदयनराजेंनी हात जोडत राज्यकर्त्यांना महत्वाची विनंती केली. जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही. प्रत्येकाला जगायचा आणि चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जातीपातीचं राजकारण सोडून द्या. महाराजांचे विचार आचरणात आणा. कोणाला पाडायचं आहे ते पाडा. मी तर निवडणूक लढवणार नाही. पण, जातीवरुन फूट पाडू नका. देशाचे तुकडे करु नका. नाहीतर देशाची वाट लागेल, अशी हात जोडून विनंती उदयनराजे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. आज जी मानसिकता झाली आहे, ती सर्वांची मानसिकता झाली आहे. मेरिटच्या आधारावर लाभ मिळावा असं मला वाटतं. जातीजातीमध्ये कोण तेढ निर्माण करताहेत हे शोधून काढा. महाराजांनी कोणालाही अंतर दिलं नाही. जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं.
आर्थिक निकषावर आरक्षण सर्वांना मिळतं. मला यावर बोलायचं नाही, नाहीतर खूप काही बोललो असतो. प्रश्न सोडवणार नसाल तर जगायचं कसं? जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही, असे देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हंटले.
उदयनराजेंनी कानमंत्र देताच जरांगे पाटील म्हणाले…
मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात सभा घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान उदयनराजेंनी मनोज जरांगे यांना कानमंत्र दिला. याबाबत जरांगे- पाटील म्हणाले की, “कानात दिलेला हा आशिर्वाद मी सांगणार नाही. कारण कानात दिलेला आशिर्वाद सांगायचा नसतो. ते मनात ठेवून लढायचं असतं. महाराज साहेबांचा आशिर्वाद घेतला. लढण्यासाठी शक्ती पाहिजे अन् या गादीनं (सातारा) महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गोरगरीबांच्या पाठीवर हात फिरवला आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी आशिर्वाद घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. महाराजांच्या आशिर्वादामुळे आंदोलनाला १०० टक्के दिशा मिळणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हंटले.